सांगली -नवाब मलिक म्हणजे ओरडणारा कोंबडा,अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर केलेल्या टीकेवरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली आहे. तसेच आत्मक्लेशसाठी मुंबई यात्रा काढणाऱ्यांची आताची पश्चाताप यात्रा काशीपर्यंत जाणार आहे का? असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकाऱ्यांची काळी दिवाळी -
ठाकरे सरकारच्या खोटारड्या धोरणामुळे काळी दिवाळी करण्याची वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. अतिवृष्टी, महापूर व कोरोना अशा तिहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपण पॅकेज नाही, मदत देणार अशी घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात फसवे पॅकेज जाहीर केले. जे पॅकेज जाहीर केले, ते म्हणजे हिमालय पोखरून उंदीर बाहेर काढण्यासारखे पॅकेज आहे. त्यामुळे महापुरातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशीच फसवणूक अतिवृष्टीबाबत आहे. सरसकट मदत देण्याबाबत सरकारने पळ काढला आहे.
हे ही वाचा -क्रूज ड्रग्ज प्रकरण : अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात दिली तक्रार
शेट्टी आता काशीपर्यंत जाणार का ?
मागच्या वेळी भाजपामध्ये असताना त्यांना आत्मक्लेश झाला होता. त्यामुळे त्यांनी महात्मा फुले यांच्या घरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मुंबईपर्यंत आत्मक्लेश यात्रा काढली. आता या सरकारमध्ये त्यांना पश्चाताप झाला आहे, त्यामुळे त्यांची पश्चाताप यात्रा आता काशीपर्यंत जाणार का ? असा टोला राजू शेट्टी यांचे नाव न घेता खोत यांनी लगावला आहे.
लवकरच भव्य परिषद -
शेतकरी, शेतमजूर, ऊस तोडणी, ऊस वाहतूकदार यांच्यासह एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य परिषद घेऊन सरकारविरोधात मैदानात उतरणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले.