सांगली - जत तालुक्यातील बेवणुर येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना आज (बुधवारी) संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यामधील घोरपडी येथील एका कोरोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात हे कुटुंबीय आले होते. संबंधित नातेवाईकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या सर्वांना संस्थात्म क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हेही वाचा...पोलीस निरीक्षकाच्या मुलाला कोरोनाची लागण
दोन दिवसांपूर्वी घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथील एक ट्रक चालक मुंबई येथून परत आला होता. तो चालक कोरोनो पॉझिटिव्ह आढळल्याने सध्या त्याच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील रुग्ण मुंबईतुन परत आल्यानंतर जत तालुक्यातील बेवणुर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता. शिवाय त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी त्याचे बेवणूर येथील नातेवाईक गेले होते. याची माहिती मिळताच जत येथील तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी तातडीने बेवणुर येथे जात. संबंधित कुटुंबातील सहा जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले.
यामध्ये रुग्णाची पत्नी, दोन मुले, त्याचे आई वडील यांचा समावेश आहे. त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना जत येथील मागासवर्गीय वसतीगृहात संस्थात्मक क्वारंटाई करण्यात आले आहे. पाच दिवसानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ बंडगर यांनी सांगितले.