महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाहुण्यांकडे देखील अशा सुविधा मिळाल्या नसत्या, निवारा केंद्रातील पूरग्रस्तांच्या भावना - Reaction of flood victims

सांगलीतील कृष्णा आणि वारणा काठचा महापूर ओसरत आहे. मात्र यामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाली. हजारो नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्राचा आसरा घ्यावा लागला. प्रशासान आणि सामजिक संस्थांच्या माध्यमातून निवारा केंद्रात पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. जेवणापासून आरोग्य अशा सर्व पातळीवर पूरग्रस्तांची काळजी घेण्यात येत आहे.

पूरग्रस्तांच्या भावना
पूरग्रस्तांच्या भावना

By

Published : Jul 29, 2021, 6:13 PM IST

सांगली- जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा काठचा महापूर ओसरत आहे. मात्र यामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाली. हजारो नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्राचा आसरा घ्यावा लागला. प्रशासान आणि सामजिक संस्थांच्या माध्यमातून निवारा केंद्रात पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. जेवणापासून आरोग्य अशा सर्व पातळीवर पूरग्रस्तांची काळजी घेण्यात येत आहे. पाहूयात याबाबत ईटीव्ही भारतकडून सांगलीत सुरू असलेल्या निवारा केंद्रात करण्यात आलेला रियालिटी चेक.

पाहुण्यांकडे देखील अशा सुविधा मिळाल्या नसत्या, निवारा केंद्रातील पूरग्रस्तांच्या भावना

निवारा केंद्रात पूरग्रस्तांना आश्रय -
सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांना महापूर आला. बघता-बघता या महापुराने जवळपास दीडशेहून अधिक गावांना आपल्या कवेत घेतले. सांगली शहरही या महापुराने बुडवले, त्यामुळे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. पाण्याची पातळी जसजशी वाढत होती, त्यावेळी प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत होतं. अनेक नागरिकांनी आपल्या नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. मात्र ज्या नागरिकांची सोय कुठेच होत नव्हती. त्यांना त्यांच्या परिसरात सुरक्षित अशा निवारा केंद्रात ठेवण्यात आले.

50 हजारांहून अधिक पूरग्रस्तांची सोय
जवळपास पन्नास हजारांहून अधिक नागरिकांना प्रशासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रात आसरा मिळाला. अनेक कुटुंबांना काहीच हातात न घेता बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे या सर्वांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी सुरू केलेल्या निवारा केंद्रात सर्वच पूरग्रस्तांची योग्य ती सोय झाल्याचे पाहायला मिळाले. सांगली शहरामध्ये महापालिका प्रशासनाच्या वतीने जवळपास 17 ठिकाणी पूरग्रस्तांसाठी तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आले. त्याचबरोबर काही सामाजिक संस्थांनीही यामध्ये सहभाग घेत महापालिकेच्या माध्यमातून निवारा केंद्र सुरू केले. अशाच एका निवारा केंद्र असणाऱ्या ठिकाणी पूरग्रस्तांची सोय कशी करण्यात आली, याचे ईटीव्ही भारत कडून रियालिटी चेक करण्यात आले.

चहापासून सर्व सुविधा उपलब्ध
सांगली शहरातल्या दामाणी हायस्कूल या ठिकाणी मदनभाऊ पाटील युवा मंचच्या माध्यमातून पूरग्रस्त निवारा केंद्र उभारण्यात आले होते. ज्यामध्ये शहरातल्या अनेक भागातले पूरग्रस्त आश्रयाला होते. जवळपास 270 व्यक्ती चार दिवस मुक्कामाला होते. या ठिकाणी पूरग्रस्तांना चहा, नाष्टा, जेवण त्याचबरोबर कपडे आणि इतर मदतही करण्यात आली. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचीही योग्य ती काळजी घेण्यात आली. तसेच वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कमतरता याठिकाणी निवारा केंद्रामध्ये भासली, नसल्याचे पूरग्रस्तांकडून सांगण्यात आले.

यंदा चार वेळेपेक्षा चांगली सोय
पूरग्रस्त निवारा केंद्रात राहणारे रफिक शेख म्हणाले, जवळपास चार वेळा आपण निवारा केंद्रात आतापर्यंत आश्रय घेतला आहे. 2005 च्या आधी देखील सांगली शहरांमध्ये पूर आला होता. त्यावेळी आपल्या घरात पाणी शिरले होते. त्यानंतर 2005 आणि 2019 असेल त्यावेळीही घर पाण्याखाली होते. 2019 मध्ये खूप अवस्था वाईट झाली होती, कॉलेज कॉर्नर येथील पूर केंद्रातून देखील पुराचे पाणी आल्याने विस्थापित व्हायची वेळ आली होती आणि इतर सुविधा आहे, त्यावेळी मिळण्यात 3 दिवस लागले होते. मात्र यावेळी त्या लवकर मिळाले आहेत. या ठिकाणी चहा, नाष्टा, जेवणापासून सर्व गोष्टी वेळेत आणि भरपूर उपलब्ध करुन देण्यात आल्या. अगदी घरच्याप्रमाणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळाल्याची भावना पूरग्रस्त शेख यांनी व्यक्त केली आहे.

पाहुण्यांकडे देखील अशा सुविधा मिळाल्या नसत्या
आकाशवाणी मागे काळीवाट याठिकाणी राहणाऱ्या आणि सध्या निवारा केंद्रात आश्रयाला असणाऱ्या प्रज्ञा प्रभू देसाई म्हणाल्या, सुरुवातीला आमच्या घरात पाणी येणार नाही, असे वाटले होते. त्यामुळे आम्ही घरी थांबलो, मात्र अचानक पाण्याची पातळी खूप वाढली आणि आमच्या घरात देखील पाणी शिरले. त्यामुळे कमरेच्यावर पाण्यातून आम्ही कस-बसं जीव वाचवून स्टँडजवळ पोहोचलो. त्यानंतर आम्हाला या ठिकाणी पाठवण्यात आले. घरातून काहीच साहित्य घ्यायची संधी मिळाली नव्हती आणि जायचे कुठे हा प्रश्न होता? मात्र या ठिकाणी पूरग्रस्त निवारा केंद्रात सगळी व्यवस्था झाली. अगदी पाहुण्यांच्या घरात देखील जी सुविधा मिळाली नसती, ती या ठिकाणी आम्हाला मिळाली.

कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही
पूरग्रस्तांसाठी पालिका प्रशासन आणि मदनभाऊ पाटील युवा मंचच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जेवणापासून इतर गोष्टी असतील किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी असेल हे क्षणोक्षणी घेण्यात आली होती. त्याचबरोबर ज्या नागरिकांकडे कपडेलत्ते नाहीत त्यांना चांगल्या पद्धतीचे कपडेही उपलब्ध करून देण्यात आले. तसेच पाणी पोहोचल्यानंतर कुटुंब आपल्या घरी परतत आहेत. त्यांना अन्नधान्याचं किट देखील देण्यात येत आहे, असे मदन भाऊ पाटील युवा मंच अध्यक्ष व निवारा केंद्राचे प्रमुख आनंदा लेंगरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा- वैद्यकीय शिक्षणात ओबीसी वर्गाला 27 टक्के तर आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details