सांगली - कर्जमाफीवरून ठाकरे सरकार अनेकांच्या टीकेचे धनी ठरत आहे. 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं', असे होर्डिंग लावले कशाला', असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. शहरात आज (3 जानेवारी) राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी कर्जमुक्ती मेळावा पार पडला. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी 8 जानेवारीच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले आहे.
मेळाव्यात राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर जोरदार टीका केली. या योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होणार नसून ज्यांनी शेती सोडली आहे, अशा कर्जधारकांना होणार असाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर, गावोगावी होर्डिंग लावण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.