सांगली -तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, अतिवृष्टी व महापुराबाबत शेतकऱयांच्या मदतीसाठी केवळ घोषणा करुन पोट भरणार नाही, प्रत्यक्ष मदत द्या, अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषामध्ये पडून असलेल्या हजार कोटी रुपयांमधून महाराष्ट्राला सढळ हाताने मदत घ्यावी, असे खडेबोल केंद्राला सुनावले आहेत. सांगलीमध्ये पार पडलेल्या ऊस वाहतूकदार संघटनेच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी हेही वाचा -'जलयुक्त शिवार'मुळे महापूर आला म्हणणे हास्यास्पद - चंद्रकांत पाटील
- अन्यथा गळीत हंगाम बंद करू -
राज्यातील ऊस वाहतुकदारांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगलीमध्ये ऊस वाहतूकदारांचा मेळावा पार पडला आहे. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला. यावेळी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुष्पराज चौकातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील ऊस वाहतूकदारांच्या विविध समस्या व मागण्या आहेत. या मागण्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली पाहिजे. तसेच ऊस वाहतूकदारांसाठी असणाऱ्या महामंडळाकडून ऊस तोडणी मजूरांना बांधकाम कामगारांच्या धर्तीवर सवलती व लाभ सरकारने द्यावा, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास राज्यातील सर्व उस वाहतूकदार डिसेंबर व जानेवारीमध्ये कारखान्यांचा गळीत हंगाम बंद करून आंदोलनाची निर्णायक भुमिका जाहीर करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
- घोषणेने पोट भरत नाही, प्रत्यक्ष मदत द्या -
राज्यातील महापूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीवरून शेट्टी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी महापूर येऊन आज अडीच महिने उलटले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आता विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारकडून मदतीची घोषणा होत आहे, नुसती घोषणा करुन पोट भरत नाही, प्रत्यक्ष मदत द्या, अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल. तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषामध्ये पडून असलेल्या हजारो कोटी रुपयातून महाराष्ट्रासाठी सढळ हाताने मदत दिली पाहिजे. त्याचबरोबर 7 ऑक्टोबरपासून आपण अतिवृष्टीमधील नुकसानीच्या पाहणीसाठी मराठवाडा दौरा करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश