सांगली - देशात कायमस्वरूपी सत्तेचा ताम्रपट कोणालाही मिळाला नाही, त्यामुळे सत्तेचा माज आणू नका,अन्यथा एके दिवशी तुमच्या पायात पत्रे ठोकल्याशिवाय सोडणार नाही,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला दिला आहे. तसेच भाजपची चमचेगिरी करणाऱ्यांच्या बुडाखालची खुर्ची गेल्यावर कुत्रं पण विचारणार नाही,असा टोला शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथे आयोजित लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
राजू शेट्टी हातकणंगले मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून राजू शेट्टी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम तसेच नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, राष्ट्रीय नेते रामपाल सिंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.