जत (सांगली) - तालुक्यातील कंठीमध्ये भर चौकात प्रेमप्रकरणातून सराईत गुंडाची हत्या करण्यात आली आहे. धनाजी नामदेव मोठे (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रेमप्रकरणातून गुंडाची गोळ्या घालून हत्या; सांगलीच्या जतमधील प्रकार
प्रेमप्रकरणातून सराईत गुंडाची हत्या करण्यात आली. ही घटना सांगलीच्या जत तालुक्यात घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनाजी मोठे याच्यावर जिल्हा आणि जत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हेदाखल आहेत. धनाजी याचे गावातील एका अविवाहित मुलीशी अनैतिक सबंध होते. या कारणातून मुलीच्या घरचे आणि धनाजी यांच्यात वाद सुरू होते. याप्रकरणी, अगोदर मुलीच्या घरच्यांनी जत पोलीस ठाण्यात धनाजी मोठे याच्यावर गुन्हे दाखल केले होते. सतत मुलीची छेड काढत असल्याने घरच्यांनी हा राग मनात धरुन गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास गावातील आंबेडकर समाज मंदिरासमोर भर चौकात अडवले. यावेळी गोळ्या झाडून आणि डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच जतचे डीवायएसपी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटना स्थळाची पाहणी केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनास्थळी एक गावठी पिस्तुल, चार बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. तर हे पिस्तुल नेमके आरोपीचे होते की मृताचे? हे अजून स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी मृताचा भाऊ संदीप नामदेव मोठे यांनी नामदेव भीमा लांडगे, गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे, (सर्व रा. कंठी, ता.जत) यांच्याविरोधात जत पोलिसात फिर्याद दिली आहे.