सांगली - लोकांनी कोरोनाला घाबरलेच पाहिजे. कोरोनापेक्षा आपण मोठे आहोत; हे दाखवण्याचे धाडस जनतेने करू नये, अशा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. सांगली येथे जिल्ह्यातील कोरोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते. सांगली जिल्ह्यात सध्या कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, सर्व लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रशासन देखील खबरदारी घेत आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा...CORONA : गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल - आरोग्य मंत्री राजेश टोपे
बुधवारी जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात परदेशातून १९१ प्रवासी परतले आहेत. त्यापैकी ११ जणांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार झाले आहेत. त्या सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. मात्र, सर्व १९१ प्रवाशांचे होम क्वॉरंटाईन सुरू असून त्याबाबत प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. मात्र, नागरिकांनी देखील योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.