सांगली - काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पलूस-कडेगाव मतदारसंघात यंदा कदम विरुद्ध देशमुख ही पारंपरिक लढत होणार नाही. युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. मात्र, सेनेच्या ऐनवेळच्या उमेदवाराचे कितपत आव्हान असेल हा प्रश्न आहे. तर आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत कदम यांनी काँग्रेसकडून तर शिवसेनेकडून संजय विभूते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सांगलीचा पलूस-कडेगाव मतदारसंघात यंदा चुरशीची निवडणूक होईल अशी दाट शक्यता होती. मात्र, युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ही शक्यता मावळली आहे. कारण या मतदारसंघात गेल्या 35 वर्षांपासून कदम विरुद्ध देशमुख घराणे अशी पारंपरिक लढत झाली आहे. या मतदारसंघात देशमुख गटाने नेहमीच कदम गटाला जोरदार टक्कर दिली आहे. पतंगराव कदम आणि संपतराव देशमुख यांच्या मुलांमध्ये म्हणजेच आमदार विश्वजित कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात काट्याची लढत होईल, असे चित्र होते. मात्र, भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने पलूस-कडेगावची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली. मात्र, अशा स्थितीत त्यांना शिवसेनेतुन उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र याठिकाणी ऐनवेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसकडून आज (शुक्रवारी) विश्वजित कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यापूर्वी विश्वजित कदम यांनी दिवंगत पतंगराव कदम याच्या समाधीस्थळाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी समाधीस्थळाचे दर्शन घेताना विश्वजित कदम भावनिक झालेले पाहायला मिळाले.