सांगली - सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आजपासून महापालिकेकडून ऑन द स्पॉट रॅपिड टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. स्वतः महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य पथकासह रस्त्यावर उतरून सांगली शहरातील बाजारपेठेत नागरिक, व्यापारी, कामगार अशा सुमारे 200 जणांची कोरोना चाचणी केली.
कारवाईसाठी आयुक्त उतरले रस्त्यावर
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रस्त्यावरील गर्दीमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर जोरदार कारवाई सुरू केली. तसेच ज्या आस्थापनामध्ये गर्दी आहे, अशा ठिकाणी असणाऱ्या ग्राहक तसेच कामगारांची ऑन द स्पॉट रॅपिड टेस्ट सुरू केली. तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीवरसुद्धा दंडात्मक कारवाई केली. तसेच, त्यांची कोरोना चाचणीही केली.