सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, 20 एप्रिलनंतर काही भागात शिथिलता आणणार असल्याचे म्हटले जात असल्याने बाहेर गेलेले अनेकजण आपापल्या घरी परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशात वाळवा शिराळा तालुक्यातील गावांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे जिल्हाबंदीचा आदेश असूनही कोणी चोरून आल्यास त्याला क्वारंटाईन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत.
इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 25 जण कोरोनाबाधित आढळल्याने पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व नगरपालिका विभागाने जलद पावले उचलण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर इस्लामपूर बंद ठेवण्यात आले होते. जिल्हाबंदी करून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पालकमंत्री जयंत पाटील व नगरपालिका डॉक्टर यांनी सर्वोतपरी यंत्रणा राबवल्या. अखेर इस्लामपूर कोरोनामुक्त झाले.
आठवड्यापूर्वी वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील मुबंईमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे, पुन्हा सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आणि खबरदारीचा इशारा म्हणून रेठरे धरण संपूर्ण गाव लॉकडाऊन केले. याच प्रकारे तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने बाहेरून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. गावातीलच पुणे-मुंबई या ठिकाणी कामासाठी गेलेले लोक आता परत गावी आलेच तर कुटुंब प्रमुखाने किंवा शेजारील व्यक्तीने ग्रामपंचायतीला कळवणे गरजेचे आहे.
बाहेरून येणाऱ्यांना वाळवा तालुक्यात प्रवेश बंद कुरळप ग्रामपंचायतीने तर गावात येण्याचा दाखला दिला, तरच गावात प्रवेश मिळेल असा नियम केला आहे. चोरून गावात आल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे गावात डिजिटल फलक लावले आहेत. जर कोणी परवानगीशिवाय आलाच तर त्याला गावाबाहेरील प्राथमिक मराठी शाळेत क्वारंटाईन केले जाणार आहे. तिथे त्यांची आरोग्य अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली योग्य ती तपासणी केली जाणार आहे. याप्रमाणे पुण्याहून आलेल्या दोघांना संस्था विलगीकरण करून या शाळेत ठेवण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने आपल्या गावाबाहेर संस्था विलगीकरण कक्ष करावे. तसेच गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश देऊ नये. कोणी आलेच तर त्यांना घरामध्ये घेऊ नये व आपल्या गावाला सुरक्षित ठेवावे, असा आदेश कोरोना नियंत्रण अधिकारी सुहास बुधावले यांनी दिला आहे.