सांगली- काँग्रेस आघाडीच्या काळात सिंचन योजनांची स्मारके बनली होती, अशी खरमरीत टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच अलाहाबाद ते वाराणसी आम्ही जलमार्गच जर बांधला नसता तर प्रियांकांची नाव कशी गेली असती? असा खोचक टोला प्रियांका गांधी यांना लगावला. तर शेट्टी हे प्रश्न समजून न घेता आंदोलन करतात अशी टीकाही गडकरींनी केली आहे.
सांगलीच्या विटा येथील सभेत बोलताना नितीन गडकरी सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज विटा येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभेसाठी उमेदवार संजयकाका पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात पाण्याची कमी नाही तर पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. जर देशात पाणी संवर्धन करुन ते पाणी शेतीला दिल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. तर राज्यातील सिंचन योजनेवरून काँग्रेस आघाडीवर टीका करताना आघाडीच्या काळात महाराष्ट्रात अनेक सिंचन योजना सुरू झाल्या. पण त्यावेळेच्या सरकारमधील मंत्र्यांनी कंत्राटदाराकडून १० टक्के आगाऊ रक्कम घेतली. त्यामुळे १५-१५ वर्षांपासून हे प्रकल्प पूर्णपणे बंद पडले होते. यामुळे महाराष्ट्रातील ही बंद पडलेली सिंचन प्रकल्प स्मारके बनली होती, अशा शब्दात गडकरी यांनी बंद पडलेल्या सिंचन योजनांवरून आघाडी सरकारवर टीका केली.
प्रियांका गांधी अलाहाबादवरून वाराणसीला नावेत बसून गेल्या. यावेळी त्यांनी आमच्यावर टीका केली. मात्र, जर आम्ही अलाहाबाद ते वाराणसी जलमार्गच जर बांधला नसता तर तुमची नाव कशी गेली असती ? आम्ही गंगा शुद्ध केली म्हणून प्रियांका गंगेचे पाणी पिल्या. काँगेसचे सरकार असते तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दात गडकरी यांनी प्रियांका गांधी आणि काँग्रेसवर टीका केली.
दरम्यान, यावेळी गडकरींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व नेते राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला. नुसती ऊस दरावरून आंदोलने करण्यापेक्षा साखर कारखाना संदर्भातील प्रश्न समजून घ्या, असे अनेकदा मी राजू शेट्टींना सांगितले. पण राजू शेट्टी प्रश्न न समजून घेता आंदोलन करतात. आंदोलन करा, पण प्रश्न समजून घ्या. जर एकतर्फी आंदोलन केले आणि कारखानादारी संपुष्टात आली तर शेतकरी आपला ऊस कोणाकडे विकणार, याचे उत्तर शेट्टींनी द्यावे, असा सवाल गडकरींनी केला आहे.