महाराष्ट्र

maharashtra

नितीन चौगुलेंचे शिवप्रतिष्ठानला आव्हान! समर्थक धारकाऱ्यांचा 21 तारखेला सांगलीत मेळावा

By

Published : Feb 13, 2021, 3:59 PM IST

प्रखर हिंदुत्व हाच अजेंडा असणारी संघटना आता फुटीच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्या निलंबनानंतर त्यांच्या समर्थकांनी शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासमोर ठाण मांडत निलंबनाचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली होती.

नितीन चौगुलेंचे शिवप्रतिष्ठानला आव्हान! समर्थक धारकाऱ्यांचा 21 तारखेला सांगलीत मेळावा
नितीन चौगुलेंचे शिवप्रतिष्ठानला आव्हान! समर्थक धारकाऱ्यांचा 21 तारखेला सांगलीत मेळावा

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यवाहक पदावरून नितीन चौगुलेंना हटविल्यानंतर आता संघटनेतील अंतर्गत कलह समोर येत आहे. चौगुले समर्थक धारकाऱ्यांनी 21 फेब्रुवारी रोजी मेळाव्याची हाक दिली असून या मेळाव्यात नितीन चौगुले काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धारकऱ्यांचा शिवप्रतिष्ठानविरोधात बंडाचा झेंडा
'अखंड हिंदुस्थान' असा नारा असणाऱ्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेतील गृहकलह समोर आला आहे. प्रखर हिंदुत्व हाच अजेंडा असणारी संघटना आता फुटीच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्या निलंबनानंतर त्यांच्या समर्थकांनी शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासमोर ठाण मांडत निलंबनाचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप शिवप्रतिष्ठान अथवा संभाजी भिडे यांच्याकडून याबाबतची स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नितीन चौगुले आणि समर्थक धारकऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.

नितीन चौगुले समर्थकांकडून मेळाव्याचे आयोजन
शिवप्रतिष्ठानकडून अन्याय झाल्याच्या भावनेने नितीन चौगुले आणि त्यांच्या समर्थकांनी सांगलीत 21 फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या मेळाव्याची पोस्टरबाजी करत "चलो सांगली"ची हाक राज्यातील धारकऱ्यांना दिली आहे. विशेष म्हणजे या पोस्टर्समध्ये नितीन चौगुले यांच्याबरोबर संभाजी भिडे यांचाही फोटो वापरण्यात आला आहे. आता नितीन चौगुले या मेळाव्याच्या माध्यमातून काय भूमिका घेणार? धारकऱ्यांची भूमिका काय असणार? प्रति शिवप्रतिष्ठानची स्थापन होणार का? की, संभाजी भिडे आपला निर्णय बदलणार? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. शिवप्रतिष्ठानवर दबाव टाकून आपली ताकद दाखवण्यासाठी चौगुलेंनी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे.

शिवप्रतिष्ठानचे राज्यभरात धारकरी
शिवप्रतिष्ठानचे राज्यात लाखो धारकरी आहेत. संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांचा शब्द हा धारकऱ्यांसाठी अंतिम असतो. मात्र या प्रकरणामुळे आतापर्यंत एकसंध असलेल्या शिवप्रतिष्ठानमधील अंतर्गत कलह आता समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details