सांगली : शहरात झालेल्या नीट परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रामध्ये आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान याबाबत जागृत पालकांनी या घडलेल्या प्रकारानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे.
विद्यार्थ्यांना काढायला लावले कपडे: देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली. सांगलीमध्येही ही परीक्षा झाली आणि त्यावेळी अंत्यत धक्कादायक प्रकार घडला. सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यासाठी चक्क त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्यात आले. विद्यार्थिनींची तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांचे वस्त्र उलटे घालायला लावले. विद्यार्थ्यांनादेखील कपडे काढायला लावण्यात आले. परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना एका खोली जाण्यास सांगून तेथे तपासणीसाठी कपडे काढून ते उलटे परिधान करण्यास लावले. उलटे घातलेले कपडे परिधान करुन त्यांना परीक्षा देण्यास सांगण्यात आले.
पालकांचा संताप: परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता, याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकारावर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे पालकांनी म्हटले आहे. या प्रकाराविषयी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रार केली आहे. अशा प्रकारची तपासणी करून विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना उलटे कपडे घालायला लावणे हे कितपत योग्य आहे? आणि ते कोणत्या चौकटीत बसतं? याशिवाय कपडे बदलण्याच्या बाबतीत मुलींच्या सुरक्षेची कितपत काळजी घेतली गेली? हे प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत.
विद्यार्थिनीने सांगितला किस्सा: याबाबत मिरजेतील एका विद्यार्थिनीचे डॉक्टर यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. घडलेल्या प्रकराबाबत ते म्हणाले, माझी मुलगी नेटच्या परीक्षेला बसली होती. तिचा क्रमांक शहरातल्या महाविद्यालयात आला होता. जिल्हा परीक्षा केंद्रात सोडून आम्ही बाहेर थांबलो होतो, परीक्षा साडेपाच वाजता संपल्यावर, मुलगी बाहेर आली. त्यावेळी आमची नजर तिच्या कपड्यावर गेली. तिने कपडे उलटे घातले होते, हे आमच्या निदर्शनास आले. त्याविषयी विचारणा केली तर तिने सांगितले की, परीक्षा केंद्राच्या आत गेल्यानंतर आमची तपासणी करण्यात आली. आम्हाला आमचे कपडे उलटे घालण्यास सांगण्यात आले. आपल्यासोबत असणाऱ्या इतर मुली आणि त्याचबरोबर काही मुलांनादेखील त्यांचे कपडे उलटे घालण्यास सांगण्यात आले. मग आम्ही एका रूममध्ये जाऊन सर्व मुलींनी कपडे बदलले. त्यानंतर ते कपडे उलटे घातले.