सांगली - रोहित पाटील यांच्या रुपाने महाराष्ट्राला येणाऱ्या काळात दिवंगर आर. आर. पाटील यांचे कर्तृत्व मिळेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज आर आर पाटील यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व रोहित पाटील करेल असे पवार म्हणाले.
२०२४ ला रोहित पाटील हेच आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने २०२४ मधील विधानसभेचे उमेदवार म्हणून रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटल यांनी घोषणा केली. तसेच २०२४ मध्ये रोहित पाटील हे तासगावचे आमदार असतील असाही दावा त्यांनी केला. त्यांनी केलेल्या या घोषणेवर खुद्द शरद पवारांनी शिक्कामोर्तब केला.
रोहित पाटलांच्या रुपाने महाराष्ट्राला आर. आर. आबांचे कर्तृत्व मिळेल - शरद पवार आर.आर. पाटील या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणारं असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहिल. मात्र, त्यांचा पुतळा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देईल आणि पुढील ५ वर्षानंतर रोहित पाटील यांच्या रुपाने महाराष्ट्राला येणार्या काळात आबांचे कर्तृत्व मिळेल, असेही पवार यावेळी म्हणाले.
रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणाने उपस्थित सर्वांना आबांची आठवण आली होती. प्रत्येक वक्त्यांनी आपल्या भाषणात रोहित पाटील यांची भाषणशैली आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे असल्याचा आवर्जून उल्लेख केला.
आपल्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा ठसा आर आर पाटील यांनी निर्माण केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुलुख मैदानी तोफ, आधुनिक गाडगे महाराज, संसदपटू अशा अनेक बिरुदावली त्यांच्या नावापुढे लागायच्या. आबांच्या रुपाने अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात स्थान निर्माण करणारे नेतृत्व हरपलं. मात्र, आता आर. आर. पाटील यांचे हरपलेले नेतृत्व त्यांच्या मुलाच्या रूपाने पुढे येत आहे. आबांप्रमाणे वक्तृत्वशैली असणाऱ्या रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तासगावमध्ये लॉंचिंग केले. आज त्यांच्याभोवती हजारो तरुणांचा गराडा होता.