सांगली- भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत केली. तसेच मनसुख हिरेनप्रकरणी सचिन वाझेंना खलनायक करण्याचे काम भाजपा करत आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी भाजपावर केला आहे.
विधानसभा अध्यक्ष काँगेसचाच होणार -
काँग्रेस पक्ष पुन्हा क्रमांक एकवर आणि आगामी विधानसभा अध्यक्षही काँग्रेसचाच होणार, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. तसेच विरोधकांकडून सरकार पाडण्याचा दावा केला जातोय मात्र, सरकारने यशस्वीरित्या सव्वा वर्ष पूर्ण केले. त्यामुळे विरोधकांची भाषा बदलत चालली आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली. देशात महागाई वाढली आहे, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे, मात्र या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली. केंद्र सरकार जनतेला लुटण्यासाठी बसले असल्याचं म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.