सातारा- अनैतिक संबंधास अडथळा करणाऱ्या दहा वर्षाच्या पोटच्या मुलाचा आई व तिच्या प्रियकराने संगनमताने खून केला. ही घटना वाई तालुक्यातील नावेचीवाडीतील वृंदावन कॉलनीत उघडकीस आली आहे. गौरव उर्फ प्रकाश चव्हाण असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गौरवची आई अश्विनी प्रकाश चव्हाण आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार याला पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
चौथीत शिकणारा गौरव चव्हाण शुक्रवारी रात्री गंगापूर यात्रेतील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. पालकांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी गौरवची आई अश्विनीने वाई पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास गावच्या हद्दीत जाधव वस्ती येथील धोम डाव्या कालव्यात एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही युवकांना दिसला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रितसर पंचनामा करून आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली. त्यानंतर गौरवच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून मृतदेह ओळखला. गौरव कसा बेपत्ता झाला, याबाबत त्याची आई अश्विनीकडे विचारपूस केली. मात्र अश्विनीच्या सांगण्यात अनेकदा विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांनी अश्विनीला विश्वासात घेतले. त्यावेळी तिने सत्य घटना कथन केली. अश्विनी व बावधन येथील सचिन कुमार हे दोघे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरीला होते. त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते.
अश्विनी गौरवला घेऊन कार्यक्रम पाहायला गेली होती. त्यावेळी सचिनचा फोन आल्याने दोघे स्कूटीवरून शाहीर चौकात आले. त्यावेळी सचिनने गौरवला थम्स अपची बाटली दिली. त्यानंतर दोघे युनिकॉर्न दुचाकीवरुन शेलारवाडी रस्त्याला धोम डाव्या कालव्याजवळ पोहोचले. दुचाकीवरून उतरल्यानंतर गौरवला गुंगीमुळे चालता येत नव्हते. त्यावेळी अश्विनीने गौरवला बाटलीतून काय दिले, असा जाब सचिनला विचारला. त्यावर सचिनने नवऱ्यासह तुला मारून टाकेन अशी धमकी देत गौरवला कालव्यात फेकून दिले.
यावेळी गौरवने अश्विनीला हाक मारली, परंतु अश्विनी काहीच करू शकली नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. यावरून अश्विनी व प्रियकर सचिन या दोघांनी संगनमत करून गौरवचा खून केल्याचे उघडकीस आल्याने बुधवारी दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसाची पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली आहे.