सांगली- तुम्ही तिघे एकत्र या, नाहीतर चौघे या, आम्ही एकटे पुरेसे आहोत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर लगावला आहे. तसेच जगात कोणावरही बोललो तरी मंंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करतात, हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदानाच्या निमित्ताने आले असता बोलत होते.
विधान परिषदेत भाजपाचे बहुमत असेल
सांगलीच्या चांदणी चौक येथील दमाणे हायस्कूल याठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्राला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, की राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीसाठी रांगेत उभे राहून मतदान करण्यात येत असून अत्यंत चांगला उत्साह मतदारांच्यामध्ये पाहायला मिळाले आहे. म्हणून भाजपाचा दावा आहे, 6च्या 6 जागा भाजपा चांगल्या मत्ताधिक्क्याने जिंकेल. त्यानंतर विधान परिषदेच्या 66पैकी सध्या 60 असणाऱ्या आमदारांमध्ये 25 भाजपाचे आमदार आहेत. त्यामध्ये ही 6 जोडली तर 31 होतील आणि विधान परिषदेत भाजपाचे बहुमत असेल आणि इतर सगळ्यांकडे मिळून 33 असतील. त्यामुळे महाराष्ट्रात आमचा प्रयत्न चालला आहे. तुम्ही तिघे एकत्र या, नाहीतर चौघे एकत्र, मात्र आम्ही तुम्हाला एकटे पुरेसे आहोत,अशा शब्दांत आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.