सांगली - मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकवण्यासाठी न्यायालयात कणखर भूमिका मांडावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरेल,असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत मागील सरकारने केलेल्या चुका विद्यमान सरकारने करू नये, असा सल्ला देखील देण्यात आलाय.
७ जुलै रोजी मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ताकतीने आपली भूमिका मांडवी, अशी मागणी आज सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाने केली. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मागील सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत सरकारकडून मराठा आरक्षण आणि समाजाला देण्यात आलेल्या सवलतींमध्ये अनेक चुका झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे आता न्यायालयात मराठा आरक्षण टिकणारी भूमिका मांडण्याचा आग्रह क्रांती मोर्चा मार्फत करण्यात आला.