सांगली -आंब्यांचा हंगाम अजून लांब असला तरी सांगलीच्या बाजारात आंबा दाखल झाला आहे. हा आंबा कोकणातून नव्हे तर थेट दक्षिण आफ्रिकेतून सांगलीत पोहचला असून तब्बल अडीच हजार रुपये डझन इतकी मजल या आंब्याने मारली आहे. मालावीवरून आलेल्या या हापूस आंब्याला सध्या बाजारात चांगली मागणी मिळत आहे.
फळांचा राजा म्हणजे आंबा, प्रत्येक जण त्याची चव चाखण्यास आतूर असतो. पण, उन्हाळी मौसमात या आंब्याचे आगमन होत असल्याने तोपर्यंत सर्वांना आंबा खाण्याचा मोह आवरावा लागतो. मात्र, सांगलीच्या बाजारात यंदा हिवाळ्यातच आंबा दाखल झाला आहे. सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये हा आंबा विक्रीसाठी पोहचला आहे. पण आंब्याचे माहेरघर कोकणातून नव्हे तर, साता समुद्रापारहुन हा आंबा थेट सांगलीत दाखल झाला आहे. आफ्रिकेतील मालवी देशातील हा आंबा असून याच्या एक डझनाच्या 15 पेट्या सांगलीत आल्या आहेत.