सांगली -जिल्ह्यात गेल्या 24 तासात संततधार पाऊस पडल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. एका दिवसात 9 फूट असणारी कृष्णा नदीची पाणीपातळी ही 8 फुटांनी वाढून 18 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे पलूस तालुक्यातील अमणापूर या ठिकाणी कृष्णा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे, तर अंकलखोपसह 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने एकूण 2 पूल आणि 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कृष्णेच्या पाणी पातळीत 11 फुटांनी वाढ
जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात संततधार पडलेल्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. कृष्णा नदीचे सांगलीतील पाणीपातळी एका दिवसात 19 फुटांवर पोहोचली आहे. एका दिवसात कृष्णा नदीची पाणीपातळी 10 फुटाने वाढली आहे. तसेच पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. वाढलेल्या पाणीपातळीमुळे पलूस तालुक्यातले आमणापूर या ठिकाणी कृष्णा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. त्याचबरोबर अंकलखोप या ठिकाणचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.
वारणा नदीवरील 2 पूल पाण्याखाली
दुसऱ्या बाजूला वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे. चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि संततधार पाऊस, यामुळे वारणा नदी अनेक ठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे शिराळा मांगले-कांदे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ऐतवडे खुर्द-निलेवडी येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे कणेगावकडून भरतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता प्रशांसानाकडून वर्तवण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.