सांगली -कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये कोंबड्या सोडण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी शिवसेनेकडूनही महाजनादेश यात्रेला विरोध होताना दिसत आहे. 16 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये येत असून या यात्रेवर आंदोलनांचे सावट निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 16 सप्टेंबरला सांगली जिल्ह्यात येत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि विविध संघटनांनी आंदोलनाचे इशारे दिले आहेत. सांगली जिल्ह्यात नुकत्याच येवून गेलेल्या महापूरात लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकारकडून पूरग्रस्तांना मदत म्हणून सानुग्रह अनुदान घोषित करण्यात आले होते. यामध्ये ग्रामीण भागात 10 हजार व शहरी भागात 15 हजार अशी रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी प्रत्येकी पाच हजार रुपये रोख स्वरूपात पूरग्रस्तांना देण्यात आले. तर, उर्वरित रक्कम ही पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्यापही या पूरग्रस्तांना जाहीर केलेली उर्वरित रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे तातडीने पूरग्रस्तांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात यावी अशी मागणी करत 16 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या सांगली शहरातील महाजनादेश यात्रे दरम्यान आंदोलन करून यात्रा रोखण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.