सांगली- जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. शहरातून रॅली काढून या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे या श्रद्धांजली फेरीमध्ये शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनीही सहभाग घेतला होता.
पुलवामातील हुतात्म्यांना काँग्रेसकडून श्रद्धांजली; संभाजी भिडेंचीही उपस्थिती - MARTYRED
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सीआरपीएफच्या ४२ जवानांना सांगली काँग्रेसने वाहली श्रद्धांजली.. शहरातील श्रद्धांजली रॅलीत संभाजी भिडेंचाही सहभाग.. दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध...
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्य दलातील ४२ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
सांगली काँग्रेसकडूनही या हल्ल्याचा जाहीर निषेध आज सांगलीमध्ये नोंदवण्यात आला. यानिमित्ताने जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी शहरातून रॅली काढण्यात आली. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली निघाली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनीही सहभाग घेत हुतात्मा जवानांप्रति सद्भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली .