सांगली- उद्याचा महाराष्ट्र चालवू शकतील अशी व्यक्ती म्हणून आपण जयंत पाटील यांच्याकडे पाहतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या पाटील हे राष्ट्रवादीचे पुढील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे सूतोवाच केले. इस्लामपूर येथे माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते.
लोकनेते माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या 99 व्या जयंतीच्या निमित्ताने जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. इस्लामपूर येथे शानदार सोहळ्यात जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुमनताई पाटील, विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांच्यासह मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र चालवण्याची क्षमता - शरद पवार या सोहळ्या दरम्यान लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जीवनावर आधारित 'राजयोगी' या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जन्मशताब्दी समारंभात बोलताना पवार यांनी राजारामबापू पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. बापू आपले आगळे-वेगळे मित्र होते. आता त्यांचे सुपुत्र असणारे जयंत पाटील हे दोन पाऊल पुढे आहेत, अशा शब्दात जयंत पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आज महाराष्ट्र चालवू शकतील असा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत आहोत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे पुढील मुख्यमंत्री जयंत पाटील असतील असे अप्रत्यक्ष सुतोवाचही पवार यांनी केला. भाजप-सेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर टीका करताना पवार म्हणाले, की जी मंडळी राष्ट्रवादी सोडून गेलेली आहे, ते ‘काम होत नाहीत’ अशी कारणे सांगत आहेत. मात्र, काम करून घेण्याची धमक त्यांच्यात नव्हती. त्यामुळे कामे कशी होतील? तर कामे कशी करायाची असतात ते जयंतराव पाटील यांच्याकडून शिकायला पाहिजे होते, असा टोलाही पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला आहे.
विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार याने यावेळी बोलताना ‘आपल्या देशातून इंग्रजांना घालवयाला जेवढा त्रास झाला नाही. तेवढा त्रास या इंग्रजांच्या जासुसांना घालवायला होणार आहे. ते स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात आणि बी.एस.एन. एल. सारखी राष्ट्राची संपत्ती असलेली संस्था विकत आहेत. आपल्या देशात १०० पैकी ४७ लोक बेरोजगार केले आहेत. इंग्रजांनी जसे प्रयोग केले तसेच प्रयोग हे आपल्यावर करत आहेत. भाजपला हरवायचे असेल तर ज्या प्रकारे राजारामबापूंनी पदयात्रा काढली त्याप्रमाणे रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत कन्हैयाकुमार याने व्यक्त केले.