सांगली - महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस यांचे नाव काळ्या अक्षरात लिहले जाईल, असे काम फडणवीस यांनी केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली. अमित शहा यांच्या सभेत होणाऱ्या भाषणावरून या विधानसभाच्या निवडणूक आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी शाह यांना लगावला. ते सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत बोलत होते.
सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई आर आर पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ येथे आज (रविवारी) राष्ट्रवादी नेत्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आपल्या दमदार भाषणाने सभेची सुरवात केली. त्यांनंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी भाजप सरकारच्या नेत्यांवर सडकून टीका केली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आज राज्याच्या निवडणुकीसाठी अमित शाह येत आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळ, रोजगार, सिलेंडरचे दर, शेतकरी प्रश्न याबद्दल बोलण्याऐवजी कलम 370 वर बोलत आहेत. ही जम्मू-काश्मीरची निवडणूक नसून महाराष्ट्राची निवडणूक आहे, असा टोला शाह यांना लगावला. तसेच हे लोक राज्यातील प्रश्नांवर बोलत नाही, अशी टीका पाटील यांनी केली .
हेही वाचा -समोर पैलवान दिसत नाही, तर 'यांना' काय आखाडा खणायला आणलंय का, अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल