महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना कोणताही धर्म पाहत नाही, त्यामुळे सर्वांना नियम सारखेच' - जलसंपदा मंत्री जयंत पाटील बातमी

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. यामध्ये निश्चित यश मिळवू. पण, तुम्ही कुठल्याही समाजाचे असाल एकत्र येऊन उत्सव साजरा करु नका, अशी विनंती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Apr 4, 2020, 9:53 PM IST

मुंबई- कोरोना कुठलीही जात धर्म किंवा पंथ बघत नाही त्यामुळे सर्वांना नियम सारखे आहेत. आपला देश, आपले राज्य आणि आपला जिल्हा या संकटातून बाहेर काढायचा असेल तर सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागेल तरच १०० टक्के या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

ते सोशल मीडियावरुन नागरिकांशी संवाद साधत होते. मंत्री पाटील पुढे म्हणाले, सामान्य नागरिकांना दिलासा म्हणून सरकारने व प्रशासनाने चांगले काम केले आहे व करत आहे. सरकारने कोरोनाशी लढाई सुरु केली आहे ती यशस्वी होईल यात शंका नाही.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. यामध्ये निश्चित यश मिळवू. पण, तुम्ही कुठल्याही समाजाचे असाल एकत्र येऊन उत्सव साजरा करु नका, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली.

यावेळी, जयंत पाटील यांनी लॉकडाऊनचा ११ वा दिवस आहे आणि तो चांगल्या पद्धतीने जनतेकडून पाळला जात आहे. संचारबंदीमध्ये आपण ९० टक्के यशस्वी झालो आहेत. पण, काही लोक याला अपवाद आहेत. सध्या शहरी भागात म्हणजेच मुंबई, पुणे या मोठ्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन कटाक्षाने पाळला जात आहे. इस्लामपूर येथे जे रुग्ण आढळून आले त्यात भर पडलेली नाही. ती संख्या वाढणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. २५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांची प्रकृती स्थिर असून वेळेवर उपचार घेतल्याने ते सुरक्षित आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना सध्या कसलीच कमतरता भासणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. प्रत्येक गावातच मेडिकल, दवाखाने सुरू आहेत का याची पाहणी प्रशासन करत आहे. विशेष म्हणजे आशा वर्कर्स यांनी घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण केले. त्याबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शिवाय मिरज येथे कोरोना चाचणी लॅब सुरू करण्यात आली असून त्यामध्ये आवश्यक ती साधनसामुग्री देण्यात आली आहे. याचा फायदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, गोवा येथील लोकांना होणार आहे. ही आमच्या जिल्ह्यातील गौरवाची बाब आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असताना आलेल्या सूचना व प्रश्नांची उत्तरे जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

हेही वाचा -कोरोना तपासणी करणारी लॅब मिरजेत सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details