सांगली:महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत झाल्या तर त्या विनातक्रार आणि वादाविना होऊ शकतात. कुस्ती स्पर्धा यशस्वी करून दाखवून देऊ त्यानंतर कुस्तीचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रात सुरू होईल, असा विश्वास देखील पैलवान चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच पैलवानावर आज अन्याय झाल्यास तो आत्महत्येपर्यंत जातो आणि मी देखील महराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्यावर झालेल्या अन्यायानंतर आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. मात्र, त्यातून सावरलो आहे. पण, ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांना माझे सांगणे आहे की, कोणत्याही पैलवानावर आता अन्याय करू नका, असा इशारा देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पैलवान चंद्रहार पाटील बोलत होते.
अन्याय थांबविण्यासाठी प्रयत्न करणार :यावेळी पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले, देशातील अद्यावत असे पाहिले 'राष्ट्रकुल कुस्ती संकुल'विटा याठिकाणी 3 एकर क्षेत्रात उभारण्यात येत आहे. याठिकाणी मॅट, मातीच्या मैदानाबरोबर जॉगिंग ट्रॅक, स्वीमिंग पूल, हॉस्पिटल, लायब्ररीपासून 500 मल्ल राहण्यापर्यंत सर्व सुविधा आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे कुस्ती संकुल उभारण्यात येत असून त्याचे 70 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहेत. या तालमीत सध्या 50 मुले सराव करत असून इतर काम सुरू आहेत. सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या कुस्ती निर्माण झालेला वाद आणि आरोप आता कुस्ती क्षेत्रातील पैलवान यांच्यावर अन्याय हा होतच आलेला आहे. माझ्यावर देखील हा अन्याय झाला होता. त्यामुळे मी गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी देखील गेलेलो नाही. पण, कुस्ती क्षेत्रातला हा पैलवानांवरचा अन्याय कुठेतरी थांबावा म्हणून चंद्रहार पाटील विथ फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
पराभव पचवत स्वत:ला सावरले: यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान 'चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन'च्या माध्यमातून सांगली जिल्ह्याला मिळवून ही स्पर्धा विना वादविवाद यशस्वी करुन विजेत्या मल्लास 1 कोटी रुपये चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन तर्फे देण्यात येतील. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ही स्पर्धा आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करु. स्पर्धेची तारीख जाहीर झाल्यानंतर उपविजेत्या मल्लास आणि इतर वजनी गटातील विजेत्यास किती बक्षीस असेल ते स्पष्ट करण्यात येईल. त्यामुळे या स्पर्धेच्या यशानंतर नक्कीच यापुढे 'सांगली पॅटर्न' प्रमाणे तमाम महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येईल असे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.