सांगली- हलगर्जीपणा आणि वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने सांगली महापालिकेच्या प्रसूतीगृहात एका महिलेच्या गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालिका उपायुक्त यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली असून आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. उपमहापौरांनी नवी रुग्णवाहिका मिळेपर्यंत आपली गाडी रुग्णालयाला सुपूर्द केली आहे.
सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात एका महिलेच्या पोटातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीचे माहेर असणाऱ्या आशा सोमनाथ कोरडे प्रसूतीसाठी 26 जूनला महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी वेदना वाढल्याची कल्पना नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर, नर्स यांना दिली होती. यानंतर महिलेची पुन्हा तपासणी करून बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात आले, मात्र पुन्हा महिलेला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, याठिकाणी प्रसूतीग्रहाची असणारी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे नातेवाइकांनी महिलेला रिक्षातून घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. त्याठिकाणी तपासणी केली असता दोन तासापूर्वीच महिलेच्या गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.