सांगली (जत) -जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले होते. पावसामुळे जत तालुक्यातील संख, माडग्याळ, कुंभारी, डफळापूर उमराणी बिळूर, शेगाव, येळवी या भागातील शेतीच मोठे नुकसान झाले आहे. पिढ्यान् पिढ्या दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी मात्र पावसाने नुकसान केले आहे. सरकारने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करत नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.
अनेक वर्षांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जत तालुक्यात यावर्षी मात्र जोरदार पाऊस पडल्याने येथील नद्यांना पूर आला आहे. तालुक्याच्या दक्षिण, उत्तर, पश्चिम भागातील बिरनाळ, शेगाव, बिळूर, खोजनवाडी कोळीगीरी, प्रतापूर आदी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तालुक्यात थोडे छोटे मोठे पाझर तलाव भरून वाहतानाचे चित्र आहे. काशिलिंगवाडी-कोसारी ही गावे जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता.
पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले आहे तर हरभरा, भुईमूग अशा खरिपातील सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले असून उभे पिक जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेलाय. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ऊस, मका, भुईमूग, खरीप पिके तसेच पालेभाज्यांना बसला असून द्राक्ष, डाळींब या फळ बागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दुष्काळी जत तालुक्यावर अस्मानी संकट हेही वाचा-पावसामुळे सातारा जिल्ह्यात १ हजार ४२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान, कृषी विभागाचा अंदाज
तालुक्यातील आठ मंडळमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवले आहेत. सध्या उमदी मंडळमध्ये कमी पाऊस झाला आहे, शनिवारी पासून कमी 2 मीमी पाऊस झाला आहे. उमदी मंडळातील बेळोडगी या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे याशिवाय द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणीही अद्याप घेणे शक्य झालेले नाही. अती पावसामुळे द्राक्ष कड्या पक्व होणे अपेक्षित असते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे फळ धारणेसाठी आवश्यक पक्वता कड्यांमध्ये तयार झाली नाही, त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावाअशी मागणी भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मंगोंडा रवी पाटील यांनी केली आहे.