महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्हाला मोकळं करण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात, गोपीचंद पडळकरांचे संजय पाटलांना आव्हान - padalkar

भाजपचे बंडखोर व धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

गोपीचंद पडळकर

By

Published : Mar 31, 2019, 12:06 AM IST


सांगली - भाजपचे बंडखोर व धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून आपण संजय पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत पडळकर यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर


सांगली मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांना काँग्रेस महाआघाडीतील शेतकरी संघटनेची उमेदवारी मिळणार, असे निश्चित मानले जात होते. मात्र, ऐनवेळी त्यांचाऐवजी काँग्रेसचे युवा नेते व वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यावरुन गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली.
विशाल पाटील यांची उमेदवारी म्हणजे भाजपचीच उमेदवारी असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी कराडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांची आपल्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत सतीश पाटलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी आपल्याला देऊ केली होती. ती आपण मान्यही केली होती, असे असताना केवळ भाजपच्या दबावामुळे आपली उमेदवारी रद्द करण्यात आली, असा गौप्यस्फोट पडळकर यांनी केला आहे.


विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांचे कर्तृत्व काय? असा सवाल करत साखर कारखाना, संस्था, बँक सर्वकाही वसंतदादा यांच्या वारसदारांनी मोडून खाल्ले. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घेऊन ते वसंतदादा यांच्या नावाने जोगवा मागायला निघालेत. जी शेतकरी संघटना कारखानदारांच्या विरोधात भूमिका घेते, त्याच शेतकरी संघटनेचे उमेदवार आता साखर कारखानदार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय न्याय मिळणार? सवाल त्यांनी उपस्थित केला.


विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्ह्यात केवळ गुंडगिरी आणि दहशत माजवली. पक्षातल्या नेत्यांवर नेहमीच कुरघोडी केली. त्यांच्यामुळे सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकले नाही. आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे यांचा मंत्रीपदाचा पत्ता पाटील यांनी कट केला, असा आरोप पडळकर यांनी केला. जिल्ह्याचा कोणताच विकास खासदार संजय पाटलांनी केला नाही, त्यामुळे जिल्ह्याची अधोगती झाली. संजय पाटील भाजपसोबत कधीच नव्हते आणि राहणार नाहीत. त्यामुळे संजय पाटील हे एक नंबरचे गद्दार आहेत, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. खासदार संजय पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा मिळवला तो मोकळा करण्यासाठी आपण संजय पाटलांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार आहे.


तर वंचित बहुजन आघाडीकडूनही आपल्याकडे प्रस्ताव आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र, उमेदवारी मिळो अगर न मिळो पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असून ३ एप्रिल रोजी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details