सांगली- भोसे येथील ४०० वर्ष जुन्या असलेल्या प्राचीन वटवृक्षाला अखेर जीवदान मिळाले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनंतर महामार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत दखल घेतल्याने हे शक्य झाले आहे.
सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू असून यासाठी मिरज तालुक्यातील पंढरपूर मार्गावरील भोसे येथे असणारा ४०० वर्षे जुना वटवृक्ष तोडण्यात येणार होता. मात्र याला विरोध करत वृक्ष प्रेमी आणि भोसे येथील ग्रामस्थांनी महाकाय आणि ऐतिहासिक असणाऱ्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेत जिल्हा प्रशासनाला झाड न तोडण्याच्या सूचना देऊन अहवाल मागवला होता. या महामार्गाचे काम केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने त्या खात्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ४०० वर्षा पूर्वीचे वटवृक्ष जतन करण्याबाबत पत्र पाठवून विनंती केली होती.
गडकरी यांनीही याची तातडीने दखल घेतली होती. आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला झाड न तोडता महामार्ग बनवण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, दिलीप बिल्डकाॅनचे अधिकारी, ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमी यांनी प्रत्यक्षस्थळी पाहणी करुन पर्यायांवर चर्चा केली होती. यामध्ये सर्व्हिस रोडमध्ये अल्पशा बदल केल्यास झाड वाचू शकते याबाबतचे डिजाईन कंपनीला देण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव सर्वानुमते मंजुरीसाठी पाठवण्यात आला. तसेच माहितीसाठी प्रांताधिकारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही हा प्रस्ताव पाठवण्यात आला.