सांगली- कृष्णेची सांगलीतील पाणी पातळी आता ओसरू लागली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत आयर्विन पूल येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 1 फुटाने उतरली आहे. सध्या नदीची पातळी 53.5 फुटावर आहे. मात्र अत्यंत संथगतीने पाणी उतरत आहे. त्यामुळे शहरातील पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली असून नागरिकामधून सुटकेचा निश्वास सोडला जात आहे.
पालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू..
गेल्या आठवड्यात गुरुवार- शुक्रवार झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णानंदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आणि सांगली मिरज शहराला पूराच फटका बसला. आता पाऊस थांबला असला तरीही शहराला पडलेले पुराचा विळखा हा कायम आहे. सायंकाळ पर्यंत काही प्रमाणात शहरातील पाणी ओसरेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला पाणी ओसरलेल्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून साथीचे रोग उद्भवू नये यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सांगलीत कृष्णेचा पूर ओसरायला सुरुवात, आयर्विन पूलाजवळ 1 फुटाने पातळी घटली
पाऊस थांबला असला तरीही शहराला पडलेले पुराचा विळखा हा कायम आहे. सायंकाळ पर्यंत काही प्रमाणात शहरातील पाणी ओसरेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कृष्णा आणि वारणा काठाला दिलासा..
जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या 100 हुन अधिक गावात पुराचे पाणी शिरले आहे, तर अनेक गावांना पुराचा विळखा पडलेला असून अद्यापही तो कायम आहे. पण संथ गतीने आता नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे. कृष्णेची ताकारी येथे रविवारी दुपारपासून 10 फुटांने तर भिलवडी याठिकाणी 5 फुटाने पाण्याची पातळी उतरली आहे. फुटा फुटानेने वाढलेली पाणी पातळी इंचा-इंचाने ओसरत आहे. पण आता पूर ओसरू लागल्याने महापुराच्या धास्तीत असलेल्या कृष्णा आणि वारणा काठाला आता थोडा दिलासा मिळला आहे.
सध्या अलमट्टी धरणात कृष्णा नदीतून होणारी आवक ही 3 लाख क्सूसेक आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने आजही धरणातून 3 लाख क्सूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर भागातील पुराचे पाणी लवकरच ओसरण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.