सांगली - कुपवाड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दत्तात्रय पाटोळे यांच्या खुनाचा छडा सांगली पोलिसांनी अवघ्या 24 तासात लावला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली आहे.
सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी या ठिकाणी शुक्रवारी सांगली महापालिका क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा खून झाला होता. पाठलाग करत सिनेस्टाईलने हल्लेखोरांनी पाटोळे यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत त्यांचा खून केला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सांगलीतील दत्तात्रय पाटोळे खून प्रकरणी पाच आरोपींना अटक हेही वाचा -थरारक पाठलाग करत राष्ट्रवादीच्या शहर युवा उपाध्यक्षाचा कुपवाडमध्ये खून
या अज्ञात हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळावरून पोलिसांना मिळाले होते. त्यावरून सांगली पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाटोळे खून प्रकरणातील पाच संशयितांना बेडया ठोकल्या आहेत. निलेश गडदे, सचिन चव्हाण, वैभव शेजाळ, मृत्युंजय पाटोळे आणि किरण लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. यापैकी एक संशयित आरोपी हा मृत दत्तात्रय पाटोळे यांचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
मृत दत्तात्रय पाटोळे यांच्या घराजवळ राहणारा संशयित आरोपी निलेश गडदे याच्याशी काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी संशयित आरोपी निलेश गडदे याने आपल्या साथीदारांसह शुक्रवारी कुपवाड एमआयडीसीच्या रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोरेज याठिकाणी सिने स्टाईलने पाठलाग करत दत्तात्रय पाटोळे यांचा खून केला होता. तर यावेळी एक कामगार सुद्धा या हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाला होता.
हेही वाचा -अर्भक समजून अकस्मात मृत्यूची केली नोंद, पण निघाली बाहुली
कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला होता. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गतीने तपास करत पाटोळे यांच्या खुनाचा अवघ्या 24 तासांत छडा लावत उलगडा केला आहे.