सांगली- पाण्याच्या खणी शेजारी लघुशंका करणे एका आजोबांच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. लघुशंका करताना तोल जाऊन ते पाण्याच्या खणीत पडले, त्यांना एक तास जीव वाचवण्यासाठी अडकून पडावे लागले. अग्निशमन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून आजोबांची सुटका केली.
पाण्याच्या खणीशेजारी लघुशंका करायला गेलेले आजोबा पडले पाण्यात; अग्निशमन दलाने केली सुटका - Old Man
लघुशंका करण्यासाठी गेलेले शामराव साबळे तोल जाऊन खोल पाण्यात पडले. मात्र, पोहता येत असल्याने त्यांनी खणीत असणाऱ्या बोटीला पकडून जीव वाचवण्यासाठी धावा सुरु केला. सांगली पोलीस आणि अग्निशमन दलाने त्यांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले.
सांगलीच्या पुष्पराज चौकाशेजारी असणाऱ्या काळी खण या पाण्याच्या खणीत शामराव साबळे हे लघुशंकेसाठी गेले होते. यावेळी तोल जाऊन ते खोल पाण्यात पडले, त्यामुळे साबळे चांगलेच घाबरले होते. मात्र, त्यांना पोहता येत असल्याने ते पोहत पोहत खणीच्या मध्यभागी असणाऱ्या कारंजाच्या बोटीकडे गेले आणि बोटीला पकडून त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी धावा सुरू केला. रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना त्यांनी ओरडून आपला जीव वाचवण्याची विनवणी सुरू केली. मात्र, हे अंतर खूपच लांब असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांपर्यंत त्यांची हाक पोहचू शकली नाही.
अर्ध्या तासानंतर काही नागरिकांना साबळे पाण्यात अडकल्याचे निदर्शनास आले. नागरिकांना सांगली पोलीस आणि अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. यानंतर या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झाले. त्यांनी पाण्यात अडकलेल्या साबळे यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. खोल असणाऱ्या खणीला कोणताच कठडा नसल्याने दोरीच्या सहाय्याने उतरून बोटीद्वारे साबळे यांना सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढत त्यांची सुखरूप सुटका केली आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.