सांगली - जत तालुक्यातल्या सुसलादमध्ये शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना रविवारी घडली. वसंतराय ऊर्फ निंगाप्पा बनी (वय ५६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सांगलीत शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून; ११ जणांवर गुन्हा दाखल - जत
जत तालुक्यातल्या सुसलादमध्ये शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना रविवारी घडली. शेतकऱ्याला मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील सुसलाद येथील सावंत वस्तीजवळ बनी कुटुंबीयांची वस्ती आहे. येथील भावकीतीलच लोकांशी मृत निगप्पा यांचे शेत जमिनीचा वाद सुरू आहे. तर शेतात बांधण्यात येत असणाऱ्या घराच्या कारणातून मागील काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद तहसील प्रांत व पोलीस ठाण्यापर्यंत गेला. शेताच्या वादातून या दोन कुटुंबात अनेक वेळा तक्रारीही झाले आहेत.
दरम्यान, रविवारी मृत निंगाप्पा बनी व कांतू शिदरीया बनी, मुदका मलकाप्पा बनी,राजेंद्र मल्लाप्पा बनी, रावसाप्पा मल्लाप्पा बनी यांच्यात वाद झाला. या वादातून निंगाप्पा बनी यांना कुऱ्हाड, काट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना कॅमेरात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मृत निंगाप्पाचे भाऊ श्रीशैल बनी यांच्या तक्रारीवरून मुख्य चार संशयितांसह अन्य ७ जणांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.