सांगली- गतवर्षी सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात पशुधनाला बसला होता. आता त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिदिन दीड लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे दूध दरात गेल्या दोन महिन्यापासून वाढ झाली आहे.
हेही वाचा -सिपना नदीचे खळखळणारे पाणी, निसर्गाच्या सौंदर्याची उधळण अन् कोलकास विश्रामगृह...
सांगली जिल्ह्यात ऑगस्ट 2019 मध्ये महापूर आला होता. या महापुरात पशुधनाची मोठी हानी झाली होती. आज सहा महिने उलटूनही याचे परिणाम जाणवत आहेत. पशुधनाची झालेली हानी व इतर कारणांमुळे सांगली जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन तब्बल प्रतिदिन दीड लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो.
महापुरानंतर सांगलीचे दूध उत्पादन घटलं जिल्ह्यात पुराच्या आधी सुमारे ४० हजार गाई, म्हशी अशी पाळीव जनावरे होती. गेल्या तीन वर्षांपासून १५ ते १३ लाखांच्या पुढे दुधाचे उत्पादन होते. मात्र, महापुरात गायी-म्हशी अशा दुभत्या जनावरांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या बाजूला पुरामुळे चारा टंचाई निर्माण झाली होती. यासर्वांचा परिणाम जिल्ह्यातील दूध उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन महापुरानंतर तीन लाख लिटरने घटले, तर सध्या हे उत्पादन दीड लाख लिटरने वाढले आहे. मात्र तरीही दीड लाख लिटरची घट कायम आहे. सध्या दररोज होणाऱ्या सुमारे १२ लाख लिटर दूध संकलनापैकी ४० टक्के गाईचे दूध आहे. तर, घटलेल्या दुधाच्या उत्पादनाचा परिणाम दूध दरावरही झाला आहे. दुधाचे दर बाजारात वाढले आहेत.
एक नजर जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षातील दूध संकलन आकडेवारीवर -
- एप्रिल २०१७/१८ मध्ये दूध संकलन आकडा - १५ लाख १९ हजार ९२७ लिटर
- एप्रिल २०१८/१९ मध्ये दूध संकलन आकडा- १४ लाख ६२ हजार ०७७ लिटर
- ऑगस्ट २०१९ च्या पुरानंतर मात्र हा दूध संकलनाचा आकडा १० लाख ३७ हजार ८१ लिटर होता.
- जानेवारी २०१९/२० पर्यंत १२ लाख २१ हजार ३८२ लिटर आहे.
- महापुरानंतर १० लाखांवर आलेले दूध संकलन गेल्या पाच महिन्यात १२ लाखांवर आले असले तरी, सरासरी दूध उत्पादनात अद्याप दीड लाखांची घट आहे. तर, पुढील सहा महिन्यात या दूध उत्पादनात वाढ होण्याची शक्यता दुग्ध विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महापुराच्या फटक्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची अर्थव्यवस्थाच बिघडून गेली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे दुधाचे उत्पादन घटल्याने दोन महिन्यात दोन रुपयांनी दुधात वाढ झाली आहे. तर, दुग्धजन्य पदार्थाच्या किमतीदेखील वाढू लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना जास्त रक्कम मोजावी लागत आहे.