चिखलामुळे रस्त्यात अडकलेल्या बसला चक्क जेसीबीने दिला धक्का; व्हिडीओ व्हायरल - bus
चिखलामुळे रस्त्यात अडकलेल्या बसला चक्क जेसीबीने धक्का देऊन काढण्याची वेळ आली आहे. सांगलीच्या गुहागर-विजापूर महामार्गावरील ही घटना आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सांगली - जिल्ह्यातील गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम चालू आहे, गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम बंद असल्याने रस्त्याची अवस्था पाऊसामुळे अत्यंत वाईट झालेली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर एका ट्रॅव्हल्सचा दलदलीत वाट काढत असलेला डांसिंग व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच गुहागर-विजापूर महामार्गावरील पळशी-हिवरे गावा दरम्यान चिखलात फसलेल्या बसला, जेसीबीने ढकलत बाहेर काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या घसरत आहेत, यामुळे या मार्गावर पदचारी, दुचाकी स्वारांबरोबरच बस, ट्रक यांसारखी मोठी वाहने चालनणाऱया चालकांना देखील प्रवास करणे कठीण झाले आहे. या मार्गावरील गावांतील लोकांना चिखलातून मार्ग काढणे जिकरीचे ठरत असून काही लोक गावातून बाहेर न पडणे पसंत करत आहेत.