सांगली- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला थेट खासदार धैर्यशील माने यांनाच अडवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून आत प्रवेश नाकारल्याने प्रवेश दारावरच संतप्त खासदार माने आणि पोलीस अधिकारी यांची शाब्दीक चकमक उडाली.
सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (दि. 25 जानेवारी) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात पार पडली. मात्र, या बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना अडवण्यात आल्याचा प्रकार घडला. बैठक सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. पण, काही वेळानंतर या ठिकाणी खासदार धैर्यशील माने पोहोचले. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अधिकारी हे माने यांना ओळखत नसल्याने, त्यांनी माने यांना आत जाण्यापासून रोखले. या नंतर खासदार माने हे चांगलेच संतापले.