सांगली : सांगली जिल्हा परिषदपाठोपाठ जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. उपजिल्हाधिकारी असणाऱ्या महिला अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. तर सांगली शहरातील एका नगरसेवकालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची यंत्रणा हादरून गेली आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे १०६ रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोनाला दूर ठेवण्याचे काम केले होते. या कार्यालयात एकालाही लागण झालेली नव्हती. मात्र, गेल्या महिनाभर जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. जून महिना अखेरीस ३८५ असलेली रुग्णसंख्या सद्या साडेतीन हजाराच्या घरात पोहचली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या विरोधात प्रशासन युद्ध पातळीवर लढत आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत असणाऱ्या कोरोना नियंत्रण कक्षातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यासह ६ जणांना कोरोना झाल्याने प्रशासन हादरून गेले होते.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथूनही जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. त्यात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या महिला अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात कार्यालयातील अनेक कर्मचारी आले आहेत. त्यामुळे कुणाला कोरोना आहे आणि कुणाला नाही, हे तपासणे आता कठीण झाले आहे. तसेच, सांगली शहरातील एका नगरसेवकाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर नगरसेवकाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, अँटिजेन चाचणीमध्ये त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ही थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या आठ दिवसांपासून ३०० पार होणारा आकडा निम्म्यावर आला आहे. सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात १०६ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पालिका क्षेत्रातील ८३ जणांचा समावेश आहे. त्यामुळे सांगलीकरांना मंगळवारी थोडा दिलासा मिळाला आहे.