महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार.. नातेवाईकांना महिलेऐवजी सोपवला पुरुषाचा मृतदेह - सांगली सरकारी रुग्णालयात मृतदेहाची आदलाबदली

सांगली शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांना चक्क पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Dead body change in sangli government hospital
Dead body change in sangli government hospital

By

Published : Mar 6, 2021, 3:14 PM IST

Updated : Mar 6, 2021, 3:21 PM IST

सांगली -कारवां या हिंदी चित्रपटातील कथेप्रमाणे घटना सांगलीत घडली आहे. सांगली शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांना चक्क पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अर्ध्या वाटेत पोहचल्यावर दुसऱ्या कोणाचा तरी मृतदेह असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले आणि पुन्हा नातेवाईकांनी सांगलीचे रुग्णालय गाठत मृतदेह बदलून घेतला.

रुग्णालयाचा भोंगळ कारभार..

सांगलीचे वसंतदादा शासकीय रुग्णालय महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातील जिल्ह्यांबरोबर शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने गोरगरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात, अशीच एक वृद्ध महिला कर्नाटक राज्यातल्या संकेश्वर येथून उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मध्यरात्री नातेवाईकांनी मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी तयारी केली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.

सांगली सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार

अ‌ॅम्ब्युलन्समधून हा मृतदेह संकेश्वरकडे घेऊन नातेवाईक निघाले होते. दरम्यान इचलकरंजी या ठिकाणी पोहोचले असता नातेवाईकांना मृतदेहाबाबत शंका आली. त्यानंतर मृतदेह पाहिला असता त्या ठिकाणी त्यांच्या महिलेच्या ऐवजी चक्क पुरुषाचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आले. यामुळे नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेऊन सांगलीचे शासकीय रुग्णालय गाठले व रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून त्या वृद्ध महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करत भोंगळ कारभारावर पडदा टाकला.

भाड्याच्या वादातून प्रकरण चव्हाट्यावर..

हा सर्व प्रकार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुरू होता. दरम्यान रुग्णवाहिकेच्या चालकाने पुन्हा मृतदेह घेऊन जाण्यासाठी भाडे वाढणार असल्याचे स्पष्ट केले, त्यानंतर त्या नातेवाइकांच्या आणि रुग्णवाहिका चालकामध्ये वादावादी झाली आणि मृतदेह आदला-बदलीचा सर्व प्रकार समोर आला. तर या प्रकरणी रुग्णवाहिका चालक-मालक संघटनेचे सांगली अध्यक्ष मुबारक शेख यांनी शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराच्या चौकशीची मागणी करत कारवाईची मागणी केली आहे.

Last Updated : Mar 6, 2021, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details