सांगली - वाळवा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 1 हजार 800 शेतकऱ्यांचे 750 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. शिवाय नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे घाई गडबडीत उरकण्यात आले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अर्ज पाठवण्यासाठीही दोनच दिवस आहेत, यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसाने 750 हेक्टर शेतातीचे नुकसान हेही वाचा-पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय
वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे भात सोयाबीन, भुईमूग, मका, भाजीपाला, ज्वारी, द्राक्ष यासारखी पिके वाया गेली आहेत. सध्या भात, सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतु, अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेली पिके पाण्यामुळे कुजून शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास वाया गेला आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी होती. मात्र, जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना फक्त दोन दिवस अर्ज करण्यासाठी वेळ देऊन शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच केली आहे. वाळवा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना 4 तारखेला अर्ज करावा अशी नोटीस दिली. तर 6 ही अंतिम तारीख असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये वाळवा तालुक्यातून फक्त 1 हजार 800 शेतकऱ्यांचीच नोंद झाली आहे. सुगीचे दिवस असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबत आहेत. काही शेतकऱ्यांना कसा अर्ज करायचा आहे, हेही माहीत नाही.
शासनाने मुदत वाढवून सर्व शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून अर्ज भरून घ्यावेत. जेणे करून शेतकऱ्यांना थोडी फार मदत होईल. खराब झालेल्या पिकांच्या काढणीनंतर शेत मोकळे करून हिवाळी पिके करण्याच्या तयारीत शेतकरी वर्ग असताना, शासनाचे अधिकारी शेतात पिके नसल्याने काही शेताचे पंचनामे करण्यास नकार देत आहेत.