सांगली- जे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते ते आता कोठे आहेत ? आता का पळवाटा काढत आहेत, असा सवाल करत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री व सांगलीचे इच्छुक उमेदवार प्रतीक पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच हिम्मत असेल तर निवडणूक लढवावी, असे आव्हान देत स्वतःच्या भावाने त्यांना निष्क्रिय ठरवले आहे, असा टोलाही लगावला आहे.
ते आज सांगलीमध्ये बोलत होते. सांगली लोकसभेच्या जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्तसंघर्ष सुरू आहे. वसंतदादा विरोधात पतंगराव कदम घराण्यातला हा संघर्ष आज उफाळून आला आहे. काँग्रेस आमदार व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर सांगली लोकसभा उमेदवारी नाकारल्यावरून निशाणा साधला आहे. लोकसभेसाठी इच्छुक असणारे आज कोठे आहेत ?, ते आता का पळवाट काढत आहेत, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रतीक पाटील व विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली आहे.
३५ वर्ष खासदारकी ज्यांच्या घरात होती ते आता तिकीट घेण्यापासून लांब का पळत आहेत? लोकसभेचे तिकीट आपल्या घरातच राहावे, यासाठी या लोकांनी काय प्रयत्न केले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आम्हाला तिकीट मिळाले नाही तर दुसरे कुणालाच मिळू नये, ही भूमिका घेणे कितपत योग्य आहे. असा सवालही कदम यांनी यावेळी उपस्थित केला.
सांगली लोकसभेची काँग्रेसची जागा कोणत्याही पक्षाला जाणार नाही. काँग्रेसकडेच ही जागा राहील, यासाठी आमचा प्रयत्न राहील. तसेच हायकमांड जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहिल, असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय झाला नाही. पण खासदार राजू शेट्टीसोबत आघाडी करून ही निवडणूक लढणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.