सांगली - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, या मागणीसाठी आज पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. तसेच, ढोल वाजवून आंदोलन केले.
सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ढोल वादन आंदोलन, अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी आर्थिक तरतुदीची केली मागणी
पालिकेकडून शिंदे मळा या ठिकाणी अहिल्यादेवी यांचा पुतळा उभारण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अद्याप या ठिकाणी पुतळा उभारण्याची कोणतीच कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. यामुळे आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेवर मोर्चा काढला.
पालिकेकडून शिंदे मळा या ठिकाणी अहिल्यादेवी यांचा पुतळा उभारण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अद्याप या ठिकाणी पुतळा उभारण्याची कोणतीच कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. तसेच हा पुतळा उभारण्यासाठी पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. याचा निषेध करण्यासाठी आज पार पडलेल्या अर्थसंकल्पीय महासभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेवर मोर्चा काढला. तसेच धनगर समाजाचे पारंपारिक ढोल वादन करुन प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा या प्रश्नाकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला.
नगरसेवक मनोज सरगर आणि वर्षा निंबाळकर यांनी या अनोख्या आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक व धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. आज पार पडलेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी तातडीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही, तर पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला.