सांगली - सांगली विधानसभेची उमेदवारी वसंतदादा घराण्यातच द्यावी, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सांगलीत आज (मंगळवारी) मदनभाऊ आणि वसंतदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन काँग्रेसमधून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अन्यथा वेगळा विचार करण्याचा गर्भित इशारा काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे उमेदवारीवरून आता काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मदनभाऊ आणि वसंतदादा गटाचा मेळावा घेऊन जयश्री पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जयश्री पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
सांगलीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागून तयारीला सुरुवात केली असताना आता वसंतदादा गटाच्या नेत्या आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेस उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच काँग्रेसला चिन्हाशिवाय लढावे लागले. मात्र, तरीही मोठे मतदान सांगली विधानसभा क्षेत्रात मिळाले होते. त्यामुळे आता याच मतांचा आधार घेऊन काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. यासाठी काही महिन्यापासून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शहरातील गल्लोगल्ली आणि गावोगावी भेटीगाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे. पक्षाकडेही पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारीसाठी रेटा लावला आहे. मागील आठवड्यापर्यंत सांगली विधानसभेसाठी पृथ्वीराज पाटील यांच्याच नावाची काँग्रेस स्तरावर चर्चा होती. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असताना आज अचानकपणे दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काँग्रेस उमेदवारीच्या रिंगणात उडी घेतली आहे.