सांगली - भाजपचा काँग्रेसमुक्त भारतचा नारा सांगली काँग्रेसने सत्त्यात उतरवला आहे. येथील काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी सांगली काँग्रेसमुक्त केली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच राजु शेट्टींच्या तक्रारीवरून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संस्थांची सीआयडी चौकशी लावली तेच शेट्टी आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आता त्यांचा स्वाभिमान कुठे गेला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सांगली येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांची प्रतिक्रिया सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कधी समाप्त होवू शकत नाही, असे बोलले जात होते. ज्या सांगलीने काँग्रेसला आशीर्वाद दिला, त्या सांगलीची आज अवस्था बिकट झाली आहे. भाजपने देशात काँग्रेसमुक्त भाजपचा नारा दिला आहे. काँग्रेस संस्कृतीपासून भारत मुक्त व्हावा, अशी आमची घोषणा होती. सांगली काँग्रेसने ते ऐकले व प्रत्यक्षात उतरवले आहे. कोणीही काँग्रेसचे तिकीट घ्यायला तयार नव्हते. काँग्रेसमध्ये एकमेकांच्या जिरवा-जिरवीचा खेळ चालू आहे. यातच त्यांनी काँग्रेस जिरवून टाकली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.
अनेक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी हे शरद पवार आणि काँग्रेसला शिव्या देत होते. माझ्याकडे शरद पवार आणि काँग्रेस विरुद्ध तक्रारी केल्या. तुमच्यामुळे त्यांचे कारखाने, बँका आणि संस्थांची आम्ही सीआयडी चौकशी लावली. पण तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहेत. कुठे गेला तुमचा स्वाभिमान, असा सवाल करत मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोल्हयाला दिल्याचे म्हणत शेट्टींवर निषाणा साधला आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीतून भाषणाला सुरुवात करत वसंतदादा घराण्यावर जोरदार टीका केली. वसंतदादा यांच्याबद्दल मला आदर आहे. पण काँग्रेस पक्ष संपवण्याचे काम काँग्रेसच करत आहे. कदाचीत सांगलीची जागा हरणार असल्याने काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सोडली आहे. पण, विशाला पाटील यांनी वसंतदाद यांचे नाव राखण्यासाठी स्वाभिमानीकडे जायला नको होते. शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आहे. संविधान धोक्यात असल्याचे आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला हात लागणार नाही. कारण त्यासाठी मी उभा आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले. त्याबरोबर राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना इंजिनाला काही अर्थ नाही. इंजिनमध्ये डिझेल पण नाही, त्यामुळे काही होणार नाही, केवळ गर्दी होत आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या जाहीर प्रचाराची सांगता सांगलीमध्ये पार पडली. शहरातील स्टेशन चौक येथे आयोजित विजय संकल्प सभेसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.