सांगली -घरफोडी करणाऱ्या एका टोळीला सांगली पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी सहा जणांना अटक केली तर दोन जण यावेळी फरार झाले आहेत. त्यांच्याकडून घरफोडीतील एक लाख ७७ हजारांची सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. घरफोडीसाठी एकत्र आले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हे कारवाई केली आहे.
दरोडे टाकणारी टोळी जेरबंद -
तासगाव तालुक्यातल्या तुरची फाटा येथील पलुसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला काही तरुण पैशाची वाटणी करण्यासाठी थांबले आहेत. अशी माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी किरण मलमे (२८), अमोल नाटेकर (२२), अक्षय चव्हाण (२४), सुनील वडर (२३), विजय जाधव (२४), आणि सूरज कोरडे (२२) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. तर मुकुंद झेंडे व विशाल कदम हे दोघे जण पसार झाले. सहा जणांच्याकडे यावेळी सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल हस्तगत करत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.