सांगली - दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दूध उत्पादक महिला शेतकऱ्यांना घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवली आहेत. सांगलीच्या आटपाडी येथील बाळेवाडीमधील गोठ्यातून ही पत्रे लिहून दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देण्याचे गायीला साकडे घालण्यात आले आहे.
महायुतीकडून दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ ऑगस्टपासून तिसऱ्या टप्प्यातील या आंदोलनात दूध दरवाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून पत्राद्वारे मागणी करण्यात येत आहे. १९ ऑगस्टपर्यंत पत्रे पाठवण्याचे आवाहन महायुतीकडून राज्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. ५ लाख पत्रे या आदोंलनाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहेत. याचपार्श्वभूमीवर आज (सोमवारी) भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीच्या बाळेवाडी याठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी दूध उत्पादक शेतकरी महिलांनी गायीला औक्षण करत दुधाला दर देण्याच्या मागणीचे पत्रे लिहली आहेत.