सांगली- काँग्रेसने दहशतवाद्यांसोबत ईलू-ईलू करत बसावे, मात्र भाजप असेपर्यंत काश्मिरला देशापासून वेगळे होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिला. काश्मीरला वेगळे करण्याची बोलले जात असताना राहुल गांधी आणि शरद पवार यांची भूमिका काय आहे, असा सवालही शाह यांनी केला. सांगली जिल्ह्यातील तासगावात संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, की देशाला फक्त नरेंद्र मोदी वाचवू शकतात. त्यामुळे देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदींना साथ द्या, असे आवाहन शाह यांनी केले. देशात सोनिया गांधी आणि मनमोहन सरकारने कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केले. मात्र गेल्या पाच वर्षात आमच्यावर एकही रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला नाही. 60 वर्षात काँग्रेसच्या काळात जनतेला केवळ लुटण्यात आले, असा आरोप शाह यांनी यावेळी केला. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका करताना राहुलबाबा आणि पवार यांना आता गरिबांची आठवण येत आहे. पण पिढ्यांन-पिढ्या राज्य केले, त्यावेळी काय केले असा सवाल शाह यांनी केला. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात गॅस, वीज कनेक्शन, घरे मोफत दिली असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 15 वर्षात वैभवशाली महाराष्ट्राचा कोणताच विकास काँग्रेस आघाडीच्या काळात झाला नाही. मात्र गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस आणि युती सरकारने महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिले असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.