सांगली - 'मी एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहे. काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता ?' असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना दिले आहे. तसेच कोरोनाच्या संकटकाळात भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कदम यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
हेही वाचा....'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम
जो शिशों के घरो मे रहते है... विश्वजीत कदमांनी लगावलेला चंद्रकांत पाटलांना टोला
'जो शिशों के घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते' अशा शब्दात कॉंग्रेस आमदार आणि मंत्री विश्वजित कदम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता. त्यामुळे काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सुरु असेलल्या वाक् युद्धात कदमांनी उडी घेतली होती. त्यावेळी बोलताना विश्वजीत कदम यांनी महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारण करु नये, असे म्हटले होते.
चंद्रकांत पाटील यांचा पलटवार...
'मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल. ते स्वत: काचेच्या घराता राहतात आणि संस्था गायरानावर आहेत. उगाच मला काढायला लावू नका. माझ्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी. सांगलीत पूर आला तेव्हा आम्ही काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. पण आज जेव्हा देश आणि राज्य करोनाचा सामना करत आहे तेव्हा भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत ? याचं उत्तर त्यांनी द्यावे. जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकमंत्री पदावरुन त्यांची हकालपट्टी केली पाहिजे.' अशी टिपण्णी चंद्रकांत पाटील यांनी केली.
सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार विश्वजीत कदमांना नाही...
कोरोनाच्या साथीमध्ये भाजप सत्तेत नसूनही जनतेच्या मदतीला धावून गेला आहे. पक्षातर्फे राज्यातील ४६ लाख लोकांच्या भोजन व्यवस्थेसह शिधा देण्यात आला आहे. अन्य मदतीची आकडेवारी मोठी आहे. अशा स्थितीत पालकमंत्री म्हणून भंडारा जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी विश्वजीत कदमांना लगावला.
हेही वाचा...."चंद्रकांत दादा काळजी घ्या ! कोरोना आजाराचा धोका साठीच्या वरील लोकांना अधिक"
आम्ही केलेल्या मदतीचा संपुर्ण महाराष्ट्र साक्षीदार : चंद्रकांत पाटील
तसेच, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला, त्यावेळी आम्ही काय केले ? याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. पुराचा फटका बसलेल्या ४ लाख ७० हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आणि पंधरा दिवस त्यांच्या भोजनाची, निवाऱ्याची व्यवस्था केली. त्या लोकांना रोज साठ रुपये निर्वाह भत्ताही दिला. आसरा घेतलेले लोक परत आपल्या घरी जाण्यास निघाले, त्यावेळी त्यांना भांडीकुंडी व कपड्यांसाठी १५ हजार रुपये दिले. तसेच सहा महिन्यांचे रेशनही दिले. दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.