महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या निकालाची पैज लावणे अंगलट, सांगलीतील 'त्या' दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जुगार अधिनियमन कायद्याअंतर्गत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे निवडणुकीच्या निकालावरून पैज लावणाऱ्यांना चांगलीच धास्ती बसली आहे.

निवडणुकीच्या निकालाची पैज

By

Published : Apr 28, 2019, 5:11 PM IST

Updated : Apr 28, 2019, 7:39 PM IST

सांगली- निवडणुकीच्या निकालावरून पैज लावणे, जिल्ह्यातील दोन कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार यासाठी मित्र असलेल्या दोन कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयाची पैज लावली होती. त्यांच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम कोरे व रणजित देसाई अशी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने निवडणुका पार पडल्या आहेत. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कोण जिंकणार याबाबत नागरिकांत प्रचंड उत्सुकता आहे. त्यातून अनेकजण पैजाही लावत आहेत. अशीच एक पैज मिरज तालुक्यातील दोन मित्रांनी लावली होती. आपलाच नेता जिंकणार असा दावा करत राजाराम कोरे आणि रणजित देसाई या दोघांनी १ लाख रुपयांची पैज लावली.

निवडणुकीच्या निकालाची पैज


राजराम कोरे यांना भाजपचे संजय पाटील निवडून येणार, हा विश्वास आहे. तर रणजित देसाई यांनी स्वाभिमानीचे विशाल पाटील हे विजयी होणार, असा विश्वास आहे. यामुळे दोघांनी पैज लावून नोटरी करत निकालानंतरच्या तारखेचा एक लाखाचा चेकही एकमेकांना दिला. या पैजेची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू झाली. नोटरी करून लावण्यात आलेल्या पैजेची सांगली पोलिसांनी गंभीर दखल घेत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. जुगार अधिनियमन कायद्याअंतर्गत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे निवडणुकीच्या निकालावरून पैज लावणाऱ्यांना चांगलीच धास्ती बसली आहे.

उस्मानाबादमध्ये दोन मित्रांनी निवडणुकीच्या निकालावरून पैज लावत नोटरी करून दुचाकी देण्याचे कबूल केले आहे.

Last Updated : Apr 28, 2019, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details